या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

भक्त कसा असावा?

एक राजा होता, तो भगवान शिवाचे रोज पूजन करायचा, राजवाड्यातून निघाल्यापासून ते मंदिरापर्यंत व मंदिरापासून राजवाड्या पर्यंत राजा नित्य दानधर्म करायचा. राजाकडून दान घेण्यासाठी याचकांची दुतर्फा अलोट गर्दी व्हायची. राजा शिवाच्या पूजेकरिता राजवाड्यातून मेवामिठाई, फळफळावळ व पूजेचे साहित्य आणायचा. धुमधडाक्यात पूजापाठ करायचा. सर्व लोकांना वाटायचे, आपला राजा केवढा धार्मिक आहे, केवढा शंकराचा भक्त आहे. हे पाहून पार्वर्ती मातेलासुद्धा वाटले की, केवढा हा थोर भक्त आहे. एवढी भक्ती करूनसुद्धा हे का बरं राजावर कृपा करत नाहीत? ती भगवान शंकराला म्हणाली, अहो, एवढा मोठा भक्त, पण तुम्ही अजून त्याच्यावर कृपा केली नाही. करा ना कृपा लवकर. हे ऐकून शंकर म्हणाले, पार्वती, अगं हे सगळं अवडंबर केलं म्हणजे तो भक्त असतो असं तुला म्हणायचे आहे का? अगं, याची पूजेकरिता काहीही गरज नाही. तुला माझा खरा भक्त पाहायचाय? चल माझ्यासोबत. मी खरा भक्त दाखवतो.

भगवान शंकर पार्वर्तीसह त्या मंदिरात आले. नेमकं त्याच वेळी राजा पूजा करण्याकरिता हत्तीवर आरूढ होऊन ऐश्‍वर्याचं प्रदर्शन करीत तेथे आला होता. आता हत्तीवरून खाली उतरणार एवढय़ात शिवाने माया रचली आणि त्या मंदिराच्या शिखराचा एक एक दगड खाली कोसळू लागला. हे पाहून राजा घाबरला आणि माहुताला आज्ञा केली की, बहुतेक भूकंप होतो आहे. हत्ती वळव व राजवाड्याकडे पळव. जसा राजा आला तसा पूजा न करताच जीव वाचवण्याकरिता पळून गेला. शंकराने फक्त पार्वतीकडे पाहिले. एवढय़ात तिथे त्या वेळेस त्या गावातला एक धनगर दर्शनासाठी आला होता. तो रोज नित्यनियमाने दर्शनाला यायचा. त्याच्याजवळ राजासारखे दान करायला द्रव्य नव्हते, पूजा करायला कुठलेही उपचार नव्हते. तो भक्तिभावाने दोन हात जोडून नमस्कार करायचा आणि आपल्या कामाला निघून जायचा. एकही दिवस चुकला नाही. आजही तो दर्शनासाठी आला होता. त्याने पाहिले की, मंदिराच्या कळसाचा एक एक दगड कोसळतो आहे, हे पाहून तो राजासारखा पळून गेला नाही, तर तो धावत गाभार्‍यात येऊन शंकराच्या पिंडीला घट्ट मिठी मारली व आपले मस्तक शिवपिंडीवर टेकवून कळवळून प्रार्थना केली की, हे देवा, हा नश्‍वर देह आज ना उद्या मातीत जाणारच आहे. देवा, माझं मस्तक फुटलं तरी चालेल, पण तुला दगड लागून इजा होता कामा नये. हे पाहून तत्काळ पार्वतीसह शिव तेथे प्रकट झाले व पार्वतीला म्हणाले, पार्वती, हा माझा खरा भक्त आहे. दोघांनीही या भक्तावर कृपा केली.

तात्पर्य:- भगवंताला तुम्ही काय दिलंय त्यापेक्षा तुमच्या अंत:करणातील भावाला फार महत्त्व आहे.