या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

बोधकथा 08/10/2015

लोक

एक फार सुंदर लोककथा आहे. अतिशय अर्थपूर्ण आहे. एकदा पृथ्वीवरील लाखो-करोडो हात आकाशाकडे झेपावले होते. त्यांच्या कंठातील ध्वनीने सारं आकाशमंडळ गुंजत होते. चौफेर हाहाकार, अंध:कार व निराशेचे दाट ढग दाटले होते. तेवढय़ात आकाशात विजेच्या कडकडाटासारखा आवाज झाला. तेव्हा आकाशवाणीने सुंदर अलंकारांनी शोभिवंत असा एक दैवी पुरुष प्रकट झाला. त्याने विचारले, 'आता काय उणीव राहिली आहे? आता तुम्हाला काय हवं आहे?'सर्वजण एका आवाजात एकदम म्हणाले, 'प्रभू, आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करणारा कोणी नाही. आम्ही पथभ्रष्ट झालो आहोत. कोणीही कुणाचं काही ऐकत नाही. एखादी देवता पाठवा.'मग त्या श्रेष्ठ शक्तिमान पुरुषाने कोमल शरीराचा मनोहर रुपाचा एक पुरुष पृथ्वीवर पाठविला. सर्व लोकांनी त्याचं पुष्पमाळांनी स्वागत केलं. त्याच्या अंगावर पाणी शिंपडून अभिषेक केला. त्याच्या चरणांना स्पर्श केला. आपापल्या गोष्टी त्याला सांगितल्या. परंतु अरेरे! तेथे काय घडले? पुष्पमाळांच्या वजनाने दबून जाऊन तो मृत्यूच्या कुशीत झोपला. नंतर त्या लोकांनी अतिशय करुण स्वरात त्या श्रेष्ठ शक्तिमान पुरुषाची आळवणी केली. त्याला घडलेली घटना सांगितली. त्याने पुन्हा एक सुकुमार कोमल पुरुष पाठविला. त्याचेसुद्धा तसेच हाल झाले. अशाप्रकारे त्या श्रेष्ठ शक्तिमान पुरुषाने तीन वेळा असे केले. शेवटी चौथ्यावेळी त्याने वरून एका पत्थराचा तुकडा खाली टाकीत त्यांना म्हटले, 'मूर्खांनो, आजपासून याच्यावर कितीही पुष्पमाळा घाला, कितीही पाण्याचा अभिषेक करा, त्याला कितीही स्पर्श करा, त्याच्यावर डोके आपटा, त्याच्याजवळ कितीही तक्रारी सांगा.. हा कधीही मरणारा नाही. युगानुयुगे हा सर्वकाही गुपचूप सहन करीत राहील.

तात्पर्य : आपल्या सर्व संतांनी आत्मा व परमात्म्याचं अदवैत सांगितलं आहे. 'जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत' म्हटलं आहे. 'मानवसेवा हीच ईश्‍वरसेवा' आहे. पम आपण देव विसरतो. जो माणसात आहे. देवांच्या मूर्ती मात्र भजतो.