या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

वाक्प्रचारांचा अर्थ


वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यांत उपयोग :-

अवगत असणे - माहित असणे.

वाक्य - आदिवासी स्त्रियांना टोपली विकण्याची कला अवगत असते.

अवगत होणे - माहित होणे, कळणे, आकलन होणे.

वाक्य - चार दिवसांच्या अभ्यासाने कॉम्पुटर कसा चालवावा, याची कला राजूला अवगत झाली.

अवगत करणे - माहित करून घेणे.

वाक्य - सायलीने संस्कृत भाषा चांगलीच अवगत केली आहे.

अवहेलना करणे - अपमान करणे, अनादर करणे.

वाक्य - गुणवान माणसाची अवहेलना करू नये.

अमर होणे - चिरकाल नाव राहणे.

वाक्य - जे देशासाठी लढून मृत्यू पावले, ते वीर अमर झाले.

अहोरात्र झटणे - रात्रंदिवस कष्ट करणे.

वाक्य - मातीतून सोने पिकवण्यासाठी शेतकरी अहोरात्र झटत असतो.

अचूक वेध घेणे - चुकता नेम साधणे.

वाक्य - नेमबाज सुकूर राजाने लक्ष्याचा अचूक वेध घेतला.

अवलंब करणे - अंगीकारणे, स्वीकारणे.

वाक्य - गुरुजींनी दिलेल्या अभ्यासाच्या वेळापत्रकाचा सईने अवलंब केला.

अजरामर होणे - कायम स्मरणात राहणे.

वाक्य - ज्या वीरांनी देशासाठी प्राणार्पण केले, ते अजरामर झाले.

अपशकुन मानणे - प्रतिकूल घडण्याचा संकेत मिळणे, वाईट शंका येणे.

वाक्य - आताच्या विज्ञाननिष्ठ जगात ' अपशकुन मानणे ' ही अंधश्रद्धा जोपासणे चुकीचे आहे.

अद्दल घडणे - शिक्षा करणे.

वाक्य - गजांआड टाकून पोलिसांनी चोरांना चांगलीच अद्दल घडवली.

अचंबा वाटणे - नवल वाटणे, आश्चर्य वाटणे.

वाक्य - चार वर्षाच्या राणीला सहजपणे संगणक चालवताना पाहून सर्वांनाच अचंबा वाटला.

अपूर्व योग येणे - दुर्मीळ योग येणे.

वाक्य - सूर्यग्रहण व चंद्रगहण एकाच दिवशी होण्याचा अपूर्व योग आला.

अमलात आणणे - कारवाई करणे.

वाक्य - माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय अमलात आणला.

अप्रूप वाटणे - आश्चर्य किंवा कौतुक वाटणे.

वाक्य - लहानगी स्नेहा जेव्हा मधुर गीत गाते, तेव्हा श्रोत्यांना तिचे अप्रूप वाटते.

अवाक होणे - आश्चर्यचकित होणे.

वाक्य - अचानक उमटलेले इंद्रधनुष्य पाहून पूर्वा अवाक झाली.

अभिनंदन करणे - कौतुक करणे.

वाक्य - दहावीच्या परीक्षेत पहिल्या आलेल्या समीरचे गुरुजींनी अभिनंदन केले.

अभंग असणे - एकसंध, अखंड असणे.

वाक्य - कितीही संकटे आली तरी भारतीयांची एकात्मता अभंग राहील.

अढी नसणे - मनात डंख न ठेवणे, मनात किल्मिष न ठेवणे.

वाक्य - स्पष्ट बोलणे झाल्यामुळे राजारामांच्या मनात मनोहरबद्दल कोणतीही अढी नव्हती.

अवसान गोळा करणे - धीर गोळा करणे.

वाक्य - शेवटी अवसान गोळा करून विकासने सरांसमोर आपला गुन्हा कबूल केला.

अशुभाची सावली पडणे - अमंगल घडणे, विपरीत घडणे.

वाक्य - लग्नानंतर चार महिन्यात विधवा झालेल्या राजश्रीवर जणू अशुभाची सावली पडली.

अलगद उचलणे - सावकाश उचलणे.

वाक्य - राजाने आपले पुस्तक अलगद उचलले.

असंतोष निर्माण होणे - चीड येणे, एखाद्या गोष्टीबद्दल खूप नाराजी निर्माण होणे.

वाक्य - इंग्रजी राजवटीविरोधी भारतीय लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

अधीर होणे - उत्सुक होणे.

वाक्य - मामाने नवीन आणलेल्या खेळणीशी खेळण्यासाठी सुमनचे मन अधीर झाले होते.

अबाधित ठेवणे - बंधन न घालणे.

वाक्य - वडिलांच्या निधनानंतर बाळूने शेतावरच हक्क अबाधित ठेवला.

अन्नान दशा होणे - उपासमारीची पाळी येणे.

वाक्य - महापुरामुळे शेकडो खेडेगावांतील लोकांची अन्नान दशा झाली आहे.

अभिलाषा धरणे - एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे.

वाक्य - आपल्या आवाक्यात नसलेल्या गोष्टीची अभिलाषा धरणे चांगले नाही.

अटक करणे - कैद करणे.

वाक्य - खूप प्रयासाने पोलिसांनी अखेर अट्टल चोरांना अटक केली.

अर्ध्या वचनात राहणे - आज्ञेत राहणे.

वाक्य - आजच्या काळात, स्त्रीने पुरुषाच्या अर्ध्या वचनात राहावे, ही अपेक्षा करणे चुकीचे आहे.

अभिप्राय देणे - मत देणे, प्रतिक्रिया करणे.

वाक्य - राजूने लिहिलेले पत्रलेखन चांगले आहे, असा सरांनी अभिप्राय दिला.

अर्धचंद्र मिळणे - हकालपट्टी होणे.

वाक्य - भ्रष्टाचार करणाऱ्यांना ताबडतोब अर्धचंद्र मिळाला पाहिजे.

उगम होणे - सुरुवात होणे.

वाक्य - त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदीचा उगम होतो.

उधळून टाकणे - विखरून टाकणे.

वाक्य - खोडकर वासराने धान्याची रास उधळून लावली.

उत्कट प्रेम असणे - खूप गाढ प्रेम असणे.

वाक्य - माझे माझ्या देशावर उत्कट प्रेम आहे.

उरी फुटून मरणे - अतिश्रमाने मरण येणे.

वाक्य - पावसाच्या अभावी अन्न पिकवण्यासाठी शेतकरी उरी फुटून मरत आहेत.

उघड्यावर टाकणे - निराधार करणे, जबाबदारी झटकणे.

वाक्य - कर्मचाऱ्यांनी संप करून, रास्ता दुरुस्तीचे काम उघड्यावर टाकले.

उदरनिर्वाह करणे - पोट भरणे, उपजीविका करणे.

वाक्य - दिवसभर शेतावर काम करून शेतकरी आपला उदरनिर्वाह करतात.

उजळ माथ्याने फिरणे - उघडपणे वावरणे.

वाक्य - अनेक गुंड जामिनावर सुटून येतात आणि उजळ माथ्याने फिरतात.

उड्डाण करणे - झेप घेणे.

वाक्य - कामानिमित्त परदेशी जाण्याऱ्या रवीच्या विमानाने अखेर उड्डाण घेतले.

उपकार फेडणे - उतराई होणे, कृतज्ञता दाखवणे.

वाक्य - ज्यांनी आपणांस मदत केली, त्यांचे उपकार फेडावेत.

उत्तेजन देणे - प्रोत्साहन देणे.

वाक्य - अक्षयला मन लावून अभ्यास करण्यासाठी गुरुजींनी भरपूर प्रोत्साहन दिले.

उन्माद होणे - गुर्मी चढणे.

वाक्य - लॉटरीत २० लाखांचे बक्षीस मिळताच धोंडिबाच्या वागण्यात उन्माद आला.

उंबरठा ओलांडणे - मर्यादा सोडणे.

वाक्य - आईला वाटेल तसे बोलून कार्तिकने उंबरठा ओलांडला.

उंडारने - बागडणे, हुंदडणे.

वाक्य - अभ्यास सोडून गावभर उंडारने बरोबर नाही, हे आई सोम्याला समजावून सांगत होती.




















































































































































































































































No comments:

Post a Comment