या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

२१)असा जन्मच नको..!

आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यात प्रश्न असतात. खरं तर असे प्रश्नच आपल्याला जगण्याचं आव्हान देत असतात. अलीकडे मी वेगळय़ाच विश्‍वात वावरतेय. जगात देव आहे की नाही, याचं युद्ध माझ्या मनात चालू आहे. या प्रश्नानं मला ग्रासलंय आणि याचं उत्तर शोधण्याचा मी क्षणाक्षणाला प्रय▪करते.. परंतु मनात कितीही वादळं उठली तरी आपले रोजचे व्यवहार करावेच लागतात.

अशाच एका कामानिमित्त मी बाहेरगावी चालले होते. आता एसटीचा प्रवास म्हटल्यावर गर्दी, ढकलाढकली आलीच. अक्षरश: मी अंतराळीच बसमध्ये चढले. वर आल्यावर उभारायलाही धड जागा नव्हती. जीव नुसता दमलेला; कदाचित तासभर उभाचं राहावं लागतंय, असा विचार माझ्या मनात घोळत होता. इतक्यात माझं लक्ष समोरच्या सीटवर गेलं आणि मी थक्कच झाले.

साधारणत: ४0 ते ४५ वर्षे वयाची ती व्यक्ती. तिच्या नाकात दोन नळय़ा होत्या. त्यातून अन्न सोडलेलं दिसत होतं. ती व्यक्ती सारखी पेंगळून पडायची. जवळ एक स्त्री बसलेली. कदाचित त्याची पत्नी असेल. त्याला मधूनच धरायची. काही तरी विचारायची. मला खूपच आश्‍चर्य वाटलं. चांगल्या माणसाला बसमध्ये चढता येत नाही आणि ही व्यक्ती बसमध्ये चढली कशी? अर्थातच बसनं या अवस्थेत प्रवास करतात म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असणार. जवळजवळ अर्धा तास मी त्यांचं निरीक्षण करत होते. त्यांच्या पलीकडची सीट रिकामी झाली व मला बसायला जागा मिळाली. मनात घोळत असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मला त्या स्त्रीकडून मिळणार होती.

'काय झालंय त्यांना?' मी हलकेच त्या स्त्रीला प्रश्न विचारला. तिचं मन विचारांनी व दु:खानं आधीच दाटून आलेलं. त्यात आपुलकीनं कोण तरी चौकशी करतंय म्हटल्यावर तिचे अश्रू वाहू लागले. स्वत:ला सावरत ती म्हणाली ''माझ्या पतीच्या पोटात वरचेवर दुखायचं. किरकोळ औषध घेऊन दुखणं वर्षभर अंगावर काढलं; पण पंधरा दिवसांपूर्वी त्यांना जास्तच त्रास व्हायला लागला म्हणून त्यांना शहर गावात चांगल्या दवाखान्यात दाखवा, असा अनेकांनी सल्ला दिला. त्याप्रमाणे आम्ही त्यांना अँडमिट केलं. तिथं वेगवेगळय़ा तपासण्या केल्या. मग निदान लागलं. यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आहेत. डॉक्टरांनी सांगितलं, ते जास्तीत जास्त महिना, पंधरा दिवस किंवा सहा महिने, कदाचित आजही ते आपल्याला सोडून जातील. पंधरा दिवसांचा दवाखान्याचा खर्च पाहून हे म्हणाले, ''नाही तर मी जगणार नाहीच; मग माझ्यावर पैसा खर्च करून कर्जबाजारी कशाला होतीस?'' तसा डायलेसिसचा खर्चही आम्हाला परवडणारा नव्हता. त्यातूनही ते वाचणार असते, तर त्यांनी कदाचित उपचार करूनही घेतले असते. आज डिसचार्ज घेऊन आम्ही बाहेर पडणार इतक्यात त्यांची तब्येत जास्तच बिघडली. डॉक्टरांनी पुन्हा उपचार केले व अँम्ब्युलन्सनं घरी जावा म्हणून सांगितलं. थोरल्या मुलानं काही तरी खटपट करून पैसे आणून दिले. त्यात दवाखान्याचं बिल भागलं; पण अँम्ब्युलन्सचा खर्च परवडायचा नाही म्हणून आम्ही एसटीनं आलो. ह्यांना हा प्रवास होणं शक्यच नाही हे माहीत असूनही आम्ही धाडस केलं. माझ्या माघारी तुला कर्जाचा जास्त त्रास नको, असं ते सारखं म्हणत असतात. धाकट्या दोन पोरी रस्त्याला डोळे लावून बसल्यात. त्यांचा बाबा बरा होऊन घरी येणार आहे; पण त्यांना काय माहीत, त्यांचा बाबा जास्त दिवसांचा सोबती नाही. कसं समजावून सांगू माझ्या लेकरांना? जिथं माझंच मन घट्ट झालं नाही, तिथं पोरांची समजूत काय घालायची? कष्ट करून गरिबीतही आम्ही आनंदानं जगत होतो. एकमेकांवर प्रेम करत होतो. माझा सुखाचा संसार देवाला का नाही बघवला? मी माझ्या पतीशिवाय जगू शकेन का?''

ती स्त्री हुंदके देऊन रडू लागली. एका अनोळखी स्त्रीबद्दल माझ्या मनात सहानुभूती निर्माण झाली. तिच्याबरोबर अश्रू ढाळू लागले. क्षणात तिचं दु:ख माझं झालं. तिचे पती हे सगळं ऐकत होते. त्यांनी तिचा हात घट्ट धरला व क्षीण आवाजात म्हणाले, ''रडू नकोस, तुला हे सर्व दु:ख सहन करण्याची परमेश्‍वर ताकद देईल. अगं, माझ्या माघारी तुला आपली मुलं मोठी करायचीत. तूच अशी रडत बसलीस तर आपल्या संसाराचं काय व्हायचं? चिमूला शिकवायचं ना? आपली स्वप्नं तुला पूर्ण करायचीत. मी समजावून सांगेन मुलांना.'' बोलता बोलता त्यांनाही जोराचा हुंदका आला.

इतक्यात माझा स्टॉप आला. मी उतरून खाली आले; पण डोळय़ांसमोरून तो प्रसंग जात नव्हता. परिस्थितीपुढे माणसाला हतबल होण्याशिवाय पर्यायच नसतो; पण मरतानाही एवढे हाल. कारण केवळ पैसा, याचं मला वाईट वाटलं. त्या व्यक्तीला इतका त्रास होत असताना बसनं प्रवास. कारण पैसा नाही. पैसा का नाही? ती शिकली नाही, चांगली नोकरी मिळाली नाही किंवा एखाद्या वतनदार किंवा मोठय़ा उद्योगपतीच्या पोटी त्यांनी जन्म घेतला नाही हीच त्यांची चूक म्हणून शेवटच्या क्षणी हे हाल भोगायचे. याच्या उलट परिस्थिती श्रीमंतांची. साधा ताप जरी आला तरी चारचाकीशिवाय हे लोक दवाखान्यात जात नाहीत.

''मृत्यू कितीही विध्वंसक असला तरी तो माणसांची शरीरं मारतो; पण जगण्याच्या स्मृतीतील त्याचं अस्तित्व तो नष्ट करू शकत नाही,'' असं कुसुमाग्रज सांगतात. ते सत्यच आहे. ती व्यक्ती आठ-दहा दिवस कशी तरी जगेल. कदाचित बसमध्येही त्याला मृत्यू येईल. त्याच्या पश्‍चात ती स्त्री आपल्या मुलांसाठी उभी राहील. पुन्हा नव्यानं जगण्याला सुखात करेल. मुलं मोठी होतील, शिकतील; पण ती स्त्री नवर्‍याचे शेवटी झालेले हाल विसरेल का? सुखातही तिला काटे बोचतील. जगात परमेश्‍वर आहे की नाही, या विचारानं आधीच माझ्या मनात थैमान घातलेलं, त्यात हा ताजा प्रसंग पाहिला. अशा न पाहिलेल्या हजारो घटना असतील. कदाचित या प्रसंगापेक्षाही विदारक.

''जगात परमेश्‍वर असो अगर नसो, पण अशी एक शक्ती आहे, जिने हे जग निर्माण केलं, ही सृष्टी निर्माण केली, त्या शक्तीला मी मनापासून प्रार्थना केली, अशी व्यक्ती तू जन्मालाच घालू नकोस, जिला सुखाने मरताही येत नाही..!''

वृषाली कुलकर्णी