या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

२८) वाचन संस्कृतीतून चळवळ उभारली

त्या फक्त नववीपर्यंत शिकल्या आहेत, पण वाचनाचे वेड इतके की, पहाटे उठून त्या एक तास वाचन करतात. भाजीविक्रीतून दररोज ५ रुपये बाजूला काढून पुस्तक घेतात. घरात ग्रंथालय असणाऱ्या आणि हजारो पुस्तके मुलांना वाटणाऱ्या बेबीताईंनी १२ आदिवासी मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेतले आहे. तीन विधवांचा पुनर्विवाह करून देणाऱ्या आणि विधवा व वीरपत्नीसाठी हळदीकुंकू उपक्रम राबविणाऱ्या, त्यासाठी समाजाचा रोष पत्करणाऱ्या बेबीताई गायकवाड या दुर्गेच्या कर्तृत्वाला आमचा सलाम!
संक्रांतीचे हळदीकुंकू म्हटले तर केवळ एक औपचारिक घरगुती समारंभ; परंतु हाच कार्यक्रम फक्त विधवांसाठीच असेल तर, तो एक कार्यक्रम न राहता समाजपरिवर्तनाचे साधन बनते. या साधनाला वाचनसंस्कृतीची जोड दिली, तर ती एक चळवळ होते. पुस्तकवाचनातून प्रेरणा मिळालेल्या आणि इतरांनाही जीवन जगण्याची प्रेरणा देणाऱ्या नगर शहरातील बेबीताई गायकवाड यांची ही चळवळ आहे. या चळवळीने काही विधवांचे पुनर्विवाहही घडवले आहेत आणि आदिवासी मुलांचे शैक्षणिक पालकत्वही घेतले आहे. त्यासाठी आधार आहे तो केवळ भाजीविक्री आणि खानावळीचा, तोही तुटपुंजा!
पाथर्डीसारख्या दुष्काळी भागातून आलेल्या बेबीताई विवाह झाला तेव्हा शिराळ चिंचोडीत (ता. पाथर्डी) शेतीवर उपजीविका करत होत्या. सततच्या दुष्काळाला वैतागून गायकवाड दाम्पत्य नगर शहरात आले. बेबीताईंचे पती अशोक गायकवाड एमआयडीसीतील एका कंपनीत कामगार होते. युनियनच्या वादातून कंपनी २००५ मध्ये बंद पडली. ७०० कुटुंबे रस्त्यावर आली. घरात खायला काही नाही. लोक तरी किती दिवस मदत करणार? अखेर या दाम्पत्याने हातगाडीवर भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू केला. तो आजही कायम आहे.
नववीपर्यंत शिक्षण झालेल्या बेबीताईंना वाचनाचे भयंकर वेड. व्यवसायातून दररोज ५ रुपये बाजूला काढून त्या एक तरी पुस्तक विकत घेतातच. दर रविवारी वेगवेगळ्या प्रकारची १२ वृत्तपत्रे आणि त्यांच्या पुरवण्यांचाही फडशा पाडतात. पतीच्या प्रोत्साहनातून निर्माण झालेली ही आवड त्यांनी मुले, त्यांचे मित्र, जेवणासाठी खानावळीत येणारे, गटाच्या संपर्कात येणाऱ्या महिला, भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्येही रुजवली आहे. त्यांच्याकडे तब्बल ९०० पुस्तकांचा संग्रह आहे. शाळा, संस्थांतून समाजप्रबोधनपर व्याख्याने देताना त्यांनी विद्यार्थ्यांना १ हजार १०० पुस्तकांचे वाटपही केले आहे. त्यांच्या स्वत:च्या कवितांचे पुस्तकही आता प्रकाशनाच्या मार्गावर आहे. बेबीताईंचा दिवस सुरू होतो पहाटे चार वाजता, पुस्तकवाचनाने! दररोज एक तास पुस्तकवाचन केलेच पाहिजे, ही शिस्त त्यांनी स्वत:ला लावून घेतली आहे.
गायकवाड दाम्पत्याची वांबोरीजवळ (ता. राहुरी) थोडी शेती आहे. या परिसरात आदिवासी भिल्ल समाजाची वस्ती आहे. या कुटुंबातील मुलांना शाळा म्हणजे काय हेच माहिती नाही, दिवसभर शेतात हुंदडणे एवढाच एक कार्यक्रम मुलांचा असतो. अशा १२ आदिवासी मुलांचे शैक्षणिक पालकत्व बेबीताईंनी घेतले आहे. त्यांची नावे जवळच्या वस्तीशाळेत टाकली. बेबीताईंचे स्वत:चेच घर छोटे आहे. मुलांसाठी जागा नाही, त्यामुळे मुलांना वांबोरीत कुटुंबातच ठेवले गेले आहे. मुले शाळेत जातात की नाही याकडे त्या लक्ष ठेवतात, मागितलेली मदत त्यांना पोहोचवतात. या खर्चासाठी त्या आपल्या भाजीविक्री व खानावळीच्या उत्पन्नातील ठरावीक रक्कम बाजूला काढून बँकेत ठेवतात.
भाजीविक्री सुरू असतानाच बेबीताईंचा भिशी चालवणाऱ्या काही महिलांशी परिचय झाला. त्यांनी समविचारी महिलांना पारखून त्यांचे स्वतंत्र ‘क्रांतीज्योती महिला मंडळ’ स्थापन केले. आपल्या घरखर्चातून रोज काही ठरावीक रक्कम बाजूला काढून हे मंडळ संस्था, गरजूंना मदत करू लागले. बेबीताईंच्या भाजीविक्रीच्या हातगाडीसमोरच आणखी एक हातगाडी होती. अवघी १५ वर्षांची एक विवाहित मुलगी तेथे भाजी विकायची. काही दिवसांतच मुलीला वैधव्य आले. तिच्या पतीचे एड्सच्या आजाराने निधन झाले. घरी सासू-सासऱ्यांकडून होणारा छळ आणि रस्त्यावर समाजाकडून वाईट नजरेने मिळणारी वागणूक ती बेबीताईंना ऐकवायची. समाजाच्या वाईट नजरेचा सामना करण्यासाठी ती मुलगी रस्त्याने येताजाताना कपाळाला टिकली लावू लागली. हातगाडीवर आली की, ती टिकली काढून ठेवत असे. त्याच दरम्यान, पती अशोक यांनी बेबीताईंना राजा राममोहन रॉय यांचे चरित्र वाचायला दिले. आणि त्या मुलीला हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला बोलावण्याचा सल्लाही दिला. त्यातूनच २०१२ मध्ये पहिला विधवा व वीरपत्नींचा हळदीकुंकवाचा जाहीर कार्यक्रम साकारला गेला. जो जवान मातृभूमीसाठी रक्त सांडतो, त्याच्या पत्नीचे कुंकू पुसण्याचा अधिकार समाजाला दिला कोणी? टिकलीमुळे महिलेचा समाजाच्या नजरेपासून बचाव होऊन तिला पुन्हा सन्मानाने रस्त्याने फिरता येईल, अशीच त्यामागची बेबीताईंची भावना होती. बेबीताई काय विपरीत करत आहेत, अशीच समाजाची पहिली प्रतिक्रिया होती. एकाने तर कार्यक्रम केला, तर तुझ्याच पतीचे निधन होईल, असे भाकीत अशोक यांच्यासमोरच वर्तवले. अशा थोतांडाला दाम्पत्याने थारा दिला नाही. पहिल्या कार्यक्रमाला तब्बल ३५ महिला उपस्थित होत्या.
मात्र कार्यक्रम होताच गायकवाड दाम्पत्यावर पहिला बहिष्कार सासर आणि माहेरच्याच लोकांनी टाकला. कोणत्याही कार्यक्रमाला त्यांना बोलावणे बंद केले. भाजीविक्रीचा व्यवसाय जवळपास निम्म्यावर आला. तरी बेबीताईंनी निर्धार सोडला नाही. केवळ हळदीकुंकूच नाही, तर अनेक समारंभांत विधवांना टाळले जाते. जी आई पतीच्या निधनानंतर मुलांना कष्टाने मोठे करते, त्यांचे विवाह लावून देते, त्या विवाहातही तिला अनेक प्रसंगांतून टाळले जाते. समाजाच्या या मानसिकतेविरुद्ध बेबीताईंनी जागृती सुरू केली. त्यासाठी विशेषत: ग्रामीण भागात त्या प्रबोधन करतात. स्वत: हजर असलेल्या विवाहात त्या जाणीवपूर्वक विधवा आईला तुळशीपूजन करायला लावतात. असे कार्यक्रम विधवांना सन्मान देऊन तर जातातच, शिवाय बेबीताईंनाही त्यातून आत्मिक समाधान देतात. गोष्ट तशी साधीच; परंतु महिलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणारी ठरली.
दुसऱ्या वर्षी याच कार्यक्रमाला ९५ जणींची उपस्थिती लाभली. तिसऱ्याच म्हणजे गेल्या वर्षी ही संख्या ५९५ वर गेली. काही सासू-सासरे तर आपल्याला सुनेला घेऊन आले होते. अशाच कार्यक्रमातून बेबीताईंच्या पुढाकारातून तीन पुनर्विवाहही झाले. तेव्हाही समाजाने बेबीताईंना त्रास दिला. नवरात्रातही त्या विधवांची खणा-नारळाने ओटी भरतात. आता तर अनेक विधवा कार्यक्रमानंतरही बेबीताईंच्या घरी येतात आणि हक्काने त्यांच्याकडून हळदीकुंकू घेऊन जातात.
बेबीताई राहत असलेला उपनगरातील हा भाग नव्यानेच विकसित होणारा आहे. अनेक घरे, बंगले, इमारतींची बांधकामे तेथे होत आहेत. तेथील रखवालदार, कामगारांत व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक आहे, त्यांच्या कुटुंबीयांना मोफत कायदेविषयक सल्ले मिळवून देणे, कार्यक्रमानिमित्त घरी येणाऱ्या विधवा त्यांच्या स्वत:च्या समस्या बेबीताईंना सांगतात, त्यासाठीही बेबीताई मार्गदर्शन करतात. बहुतांशी संस्था समाजाकडून मदत गोळा करतात, नंतरच आपले सामाजिक काम करतात. ‘क्रांतीज्योती’चे काम मात्र वेगळे आहे. समाजाकडून कोणतीही मदत न घेता स्वत:च्या घरखर्चातून बाजूला काढलेल्या रकमेतून त्या आपले उपक्रम राबतात.
आर्थिक परिस्थिती बेताची असूनही बेबीताई गायकवाड समाजासाठी जे काही करत आहेत
ते पाहता समाजाचे भवितव्य उज्ज्वल आहे याची खात्री पटते.

No comments:

Post a Comment