या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

सोनसाखळी

पांडुरंग सदाशिव साने
१) बहीणभाऊ
मधू व मालती दोघे बहीणभाऊ. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम. घरात अलोट संपत्ती होती. कशाची वाण नव्हती. आईबाप मधू-मालतीचे सारे लाड पुरवीत. मधू घोड्यावर बसायला शिके. त्याचा एक छानदार घोडा होता. मालतीचे लग्न झाले. एका जहागीरदाराच्या घरी तिला देण्यात आले. माहेरच्यापेक्षाही मालतीचे सासर श्रीमंत होते.
मधूही आता मोठा झाला होता. त्याचे अद्याप लग्न झाले नव्हते. परंतु एकाएकी त्याचे वडील वारले. वडील वारले व थोड्या दिवसांनी आई पण वारली. मधू एकटा राहिला. मालती चार दिवस माहेरी आली होती. परंतु पुन्हा सासरी गेली.
सारा कारभार मधूच्या अंगावर पडला. परंतु त्याला अनेकांनी फसविले. एकदा त्याने मोठा व्यापार केला, परंतु त्यात तो बुडाला. मधू भिकारी झाला. त्याची शेतीवाडी जप्त झाली. घरादारांचा लिलाव झाला. सुखात वाढलेला मधू, त्याला वाईट दिवस आले. ज्याच्याकडे शेकडो लोक जेवत त्याला अन्न मिळेना. जो गाद्यागिर्द्यावर झोपायचा, त्याला रस्त्यावर निजावे लागे. ज्या मधूला हजारो लोक पूर्वी हात जोडत, तोच आज सर्वांसमोर हात पसरीत होता.
मधूला वाटले आपल्या बहिणीकडे जावे. प्रथम बहिणीकडे जाण्याला तो धजत नव्हता. तो स्वाभिमानी होता. "श्रीमंत बहिणीकडे भिकाऱ्यासारखे कसे जावयाचे? जिच्याकडे पूर्वी हत्तीघोड्यांवरुन गेलो, तिच्याकडे पायी कसे जावयाचे? जरीच्या पोषाखाने पूर्वी गेलो, तेथे फाटक्या चिध्यांनी कसे जावयाचे?" परंतु मधू मनात म्हणाला, "प्रेमाला पैशाअडक्याची पर्वा नाही, हिरेमाणकांची जरुर नाही. माझी बहीण का मला दूर लोटील? छे, शक्य नाही."
मधू बहिणीकडे आला, दारात उभा राहिला. वरुन गच्चीतून बहीण बघत होती. मधूने वर पाहिले, परंतु बहीण आत निघून गेली. मधूला वाटले बहीण खाली भेटायला येत असेल. परंतु कोणी आले नाही. दरवाज्यावरील भय्याने विचारले, "कोण रे तू? येथे का उभा चोरासारखा? निघ येथून."
मधू म्हणाला, "माझ्या बहिणीचा हा वाडा आहे. तिला आत सांगा, जा."
नोकर हसला. परंतु घरात जाऊन परत आला. तो मधूला म्हणाला, "चला तिकडे गोठ्यात, तेथे तुम्हाला भाकरी आणून देतो. ती खा व जा."
मधूने विचारले, "बहिणीने काय सांगितले?"
नोकर म्हणाला, "बाईसाहेब म्हणाल्या, असेल कोणी भिकारी. बसवा गोठ्यात, द्या शिळी भाकरी."
मधू गोठ्यात गेला. त्याच्या डोळ्यांतून पाणी आले. त्याला कोरडी भाकर देण्यात आली. मधूने तेथे एक खळगा खणला व त्यात ती भाकर पुरली. पाणीही न पिता तो तेथून निघून गेला.
मधू दूर देशी गेला. तेथील राजाच्या पदरी तो नोकर राहिला. एकदा फार कठीण प्रसंग आला असता त्याच्या सल्ल्याने राजा वाचला. राजाने त्याला मुख्य प्रधान केले. मधूच्या सांगण्याप्रमाणे राजा वागे. नव्या प्रधानाची वाहवा होऊ लागली. मधूने आता विवाहही केला. तो मोठ्या बंगल्यात राहू लागला.
आपल्या बहिणीला भेटावे असे मधूच्या मनात आले. पत्नीसह तो निघाला. बरोबर हत्ती होते. घोडे होते. थाटामाटाने निघाला. पुढे जासूद बहिणीला कळविण्यासाठी गेले. बहीण एकदम उठली. ती आपल्या पतीसह सामोरी गेली. चौघडे वाजत होते, शिंगे फुंकली जात होती. थाटामाटाने भाऊ बहिणीच्या घरी आला.
दुसऱ्या दिवशी मोठी मेजवानी होती. गावातील मोठमोठ्यांना आमंत्रणे होती. चंदनाचे पाट होते. चांदीची ताटे होती. मोठा थाट होता. पंचपक्वान्ने होती. सारी मंडळी पाटावर बसली. आता जेवायला बसावयाचे. इतक्यात भाऊ एकाएकी उठला. सारे चकित झाले. "काय पाहिजे, काय हवे?" सारे विचारु लागले. परंतु मधू एकदम गोठ्यात गेला. तेथील ती जुनी मातीसारखी झालेली भाकर त्याने खणून काढली.
मालती मधूला म्हणाली, "भाऊराया, हे काय वेड्यासारखे करतोस?"
मधू म्हणाला, "ताई, तुझ्या भावाला बसायला गोठा व खायला शिळी भाकर हेच योग्य. हा आजचा थाटमाट भावासाठी नाही. हा सारा मान भावाच्या श्रीमंतीचा आहे. हे पैशाचे प्रेम आहे."
मालतीच्या डोळ्यांत पाणी आले. ती मधूच्या पाया पडून म्हणाली, "भाऊ चुकले मी. तू बहिणीला क्षमा नाही करणार? पुन्हा उतणार नाही, मातणार नाही. प्रेमाला विसरणार नाही. भाऊ, क्षमा कर. घरात चल."
मधूने मालतीचे डोळे पुसले. पुन्हा कधी मालतीने कोणाला तुच्छ मानले नाही. बाहेरची संपत्ती, ती आज आहे उद्या नाही. खरी संपत्ती हृदयाची. ती कधी गमावू नये असे ती साऱ्यांना आता सांगते. मधू व मालती दोघे बहीणभावंडे सुखी झाली तशी आपण सारी होऊ.



2) सोनसाखळी

एक होता गाव. त्या गावात एक गृहस्थ राहत होता. त्याला एक मुलगी होती. त्या मुलीचे नाव सोनसाखळी. सोनसाखळी लहान असतानाच तिची आई मेली. सोनसाखळीच्या बापाने दुसरे लग्न केले.
सोनसाखळी बापाची लाडकी होती. तो आपल्याजवळ तिला जेवायला घेई, आपल्या जवळ निजायला घेई, तिच्या जवळ कितीतरी खेळ, किती बाहुल्या, किती बुडकुली. बाप सोनसाखळीला नवीन नवीन परकर शिवी, छान छान झबली शिवी. तिच्यासाठी त्याने कितीतरी दागिने केले होते.

सोनसाखळीचा असा थाट होता. जेवायला बसताना रंगीत पाट, पाणी पिण्याला रुप्याची झारी. जेवताना सोनसाखळी बापाला म्हणे, "बाबा, मला भरवा. मी मोठी झाल्ये म्हणून काय झाले?" मग प्रेमाने बाप तिला घास देई.

सोनसाखळीचा बाप एकदा काशीस जावयास निघाला. ते जुने दिवस. सहा महिने जायला लागत, सहा महिने यायला लागत. बाप सोनसाखळीच्या सावत्र आईला म्हणाला, "हे बघ, मी दूर जात आहे. माझ्या सोनसाखळीस जप. आईवेगळी पोर. तिला बोलू नको, मारु नको. पोटच्या मुलीप्रमाणे तिचे सारे कर."

सावत्र आई म्हणाली, "हे मला सांगायला हवे? तुम्ही काळजी नका करु. सोनसाखळीचे सारे करीन. तिला गुरगुट्या भात जेवायला वाढीन, कुशीत निजायला घेईन. न्हाऊमाखू घालीन, वेणीफणी करीन. जा हो तुम्ही. सुखरुप परत या."

सोनसाखळीचा बाप गेला. सावत्र आईचा कारभार सुरु झाला. ती सोनसाखळीचा छळ करु लागली. लहान कोवळी सोनसाखळी. परंतु तिची सावत्र आई तिला पहाटे थंडीत उठवी. सोनसाखळी झाडलोट करी, भांडी घाशी. ती विहिरीवरुन पाणी आणत असे. तिला पोटभर खायला मिळेना. शिळेपाके तिला तिची सावत्र आई वाढत असे. रात्री पांघरायलाही नसे. सोनसाखळी रडे. परंतु रडली तर तिला मार बसत असे.
एक दिवशी तर तिच्या कोवळ्या हाताला सावत्र आईने डाग दिला. फुलासारखा हात, त्याच्यावर त्या दुष्ट आईने निखारा ठेवला. असे हाल सुरु झाले. सोनसाखळी बापाला घरी आल्यावर हे सारे सांगेल अशी भीती सावत्र आईस वाटत होती. म्हणून एके दिवशी रात्री तिने सोनसाखळीस ठार मारले. एका खळग्यात तिचे तुकडे पुरण्यात आले. त्या खळग्यावर सावत्र आईने डाळिंबाचे झाड लावले.

काशीहून बाप परत आला. त्याने मुलीसाठी नानाप्रकारची खेळणी आणली होती. लहानशी चुनडी आणली होती. परंतु सोनसाखळी सामोरी आली नाही. सावत्र आई एकदम डोळ्यांत पाणी आणून म्हणाली, "गेली हो आपली सोनसाखळी! तिला कमी पडू दिले नाही. देवाची इच्छा, तेथे कोणाचे काय चालणार?"

बाप दुःखी झाला. त्याला सारखी मुलीची आठवण येई. जेवताना, झोपताना डोळ्यांसमोर सोनसाखळी येई. तिची खेळणी तो जवळ घेऊन बसे व रडे. बाप आंघोळीसाठी त्या झाडाजवळ बसे. ते डाळिंबाचे झाड मोठे सुरेख वाढत होते. कशी कोवळी कोवळी तजेलदार पाने. काय असेल ते असो. बापाचे त्या झाडावर प्रेम बसले. तो त्या झाडाची पाने कुरवाळीत बसे.

त्या झाडाला फुले आली. परंतु सारी गळून एकच राहिले. त्या फुलाचे फळ झाले. फळ वाढू लागले. वाढता वाढता डाळिंब केवढे थोरले झाले! लोकांना आश्चर्य वाटले. लोक येत व बघून जात. बाप त्या डाळिंबाला दोन्ही हातांनी धरी व कुरवाळी.

शेवटी ते डाळिंब पिकले. बापाने तोडले व घरात आणले. गावातील मंडळी ओटीवर जमली. केवढे मोठे डाळींब. कलिंगडा एवढे होते. बापाने ते डाळिंब फोडण्यासाठी हातात घेतले. तो फोडणाच तोच आतून गोडसा आवाज आला, "हळूच चिरा, मी आहे हो आत." असा तो आवाज होता. सर्वांना आश्चर्य वाटले.

बापाने हलक्या हाताने डाळिंब फोडले. आतून सोनसाखळी बाहेर आली. बाहेर येताच एकदम मोठी झाली. तिने बापाला मिठी मारली. "बाबा, बाबा, पुन्हा मला सोडून नका हो जाऊ." ती म्हणाली. सोनसाखळीने सारी हकीगत सांगितली. बापाला राग आला. परंतु सावत्र आई म्हणाली, "मला क्षमा करा. पाप कधी लपत नाही, असत्य छपत नाही, मला कळले. मी नीट वागेन."

पुढे ती खरोखरच चांगल्या रीतीने वागू लागली. सोनसाखळी सुखी झाली.



3) दगडफोड्या
एक होता दगडफोड्या. गाढवांवर दगड घालून तो नेहमी नेत असे. एके दिवशी दगड लादलेली गाढवे घेऊन तो झा झा करीत जात होता. तो त्याला वाटेत शिपायांनी अडविले. ते त्याला म्हणाले, "हा रस्ता बंद आहे. राजेसाहेबांची स्वारी या रस्त्याने जाणार आहे. माहीत नाही का तुला, दिसत नाही का तुला? चालला गाढवे घेऊन. गाढवच दिसतोस."


तो दगडफोड्या म्हणाला, "मी असा राजा असतो तर किती छान झाले असते. मग मला कोणी अडविले नसते. मीच साऱ्यांना अडविले असते." त्याच्या मनात असे आले नाही तोच त्याच्यासमोर एक देवता उभी राहिली. तिने त्याला विचारले, "तुला काय राजा व्हायचे आहे?"

तो म्हणाला, "हो, मला राजा व्हायचे आहे, म्हणजे सारे हात जोडून माझ्या समोर उभे राहतील."
देवता म्हणाली, "ठीक तर. मीट डोळे व उघड म्हणजे तू राजा झालेला असशील."

दगडफोड्याने डोळे मिटले व उघडले. तो काय आश्चर्य! तो एकदम राजा झालेला. तो पांढऱ्या छानदार घोड्यावर बसलेला होता. अंगावर जरीचा पोशाख होता. डोक्यावर मुगुट होता. भालदार, चोपदार जयजयकार करीत होते. मोठमोठे शेट, सावकार, सरदार, जहागीरदार नजराणे देत होते व अदबीने नमस्कार करीत होते.

परंतु आकाशात वर सूर्य तापत होता. राजाला ताप सहन होईना. तो मनात म्हणाला, "हा सूर्य माझ्यापेक्षा मोठा दिसतो. त्याला माझी पर्वा वाटत नाही. मी सूर्य असतो तर चांगले झाले असते."
तो असे मनात म्हणतो तोच ती देवता त्याच्यासमोर उभी राहिली व म्हणाली, "काय तुला सूर्य व्हायचे आहे? मीट डोळे व उघड म्हणजे तू सूर्य झालेला असशील."

त्याने तसे केले व तो सूर्यनारायण झाला. तो आता सारा पराक्रम दाखवू लागला. बारा डोळे जणू त्याने उघडले. झाडेमाडे सुकून गेली. नद्यानाले आटून गेले. गाईगुरे तडफडू लागली. सूर्याला ऐट आली.

परंतु आकाशात एक लहानसा ढग आला. हळूहळू तो मोठा झाला. सूर्याला त्याने झाकून टाकले. सूर्याचे ऊन पृथ्वीवर पडेना. सूर्याचा प्रखर ताप पृथ्वीपर्यंत पोचेना. सूर्य मनात म्हणाला, "हा ढग माझ्याहून मोठा दिसतो, माझा प्रकाश अडवतो. मी असा ढग असतो तर किती छान झाले असते."
तो असे मनात म्हणतो तोच ती देवता समोर उभी राहिली व म्हणाली, "काय तुला ढग व्हायचे आहे?"
तो सूर्य म्हणाला, "हो."
देवता म्हणाली, "मीट डोळे व उघड म्हणजे तू ढग होशील."

तो आता ढग झाला. काळाकुट्ट ढग. दिवस असून पृथ्वीवर अंधार पडला. आता तर मुसळधार पाऊस पडू लागला. नद्यानाले भरुन गेले. शेतेभाते वाहून जाऊ लागली. गावे वाहून जाऊ लागली. जणू प्रलयकाळ आला असे वाटले. पूर्वी लोक उन्हाने मरत होते, आता पाण्यात मरु लागले. ढगाला आपल्या पराक्रमाचे कौतुक वाटले. तो अभिमानाने खाली पाहू लागला.

परंतु त्याला एक भला मोठा फत्तर दिसला. एवढा पाऊस पडत होता, तरी त्याला ढमसुद्धा झाला नव्हता. ढगाला वाटले की, हा दगड माझ्याहून मोठा दिसतो. मी जर असा दगड असतो तर बरे झाले असते. त्याच्या असे मनात येता ती देवता समोर उभी राहिली व म्हणाली, "काय तुला दगड व्हायचे आहे?"
तो म्हणाला, "हो."
ती म्हणाली, "मीट डोळे व उघड म्हणजे तू भला मोठा दगड होशील."
तो आता प्रचंड फत्तर झाला. परंतु एके दिवशी एक दगडफोड्या तेथे आला. तो घणाचे घाव घालून त्याला फोडू लागला. त्याचे तुकडे होऊ लागले. तो दगड मनात म्हणाला, "हा दगडफोड्या माझ्याहून मोठा दिसतो. मी दगडफोड्या झालो तर बरे होईल."
तो असे मनात म्हणताच ती देवता समोर उभी राहिली व म्हणाली, "तुला दगडफोड्या का दगडा व्हायचे आहे? अरे तो तर तू पूर्वी होतास. पुन्हा मूळ पदावरच आलास. हो दगडफोड्या."

पुन्हा आपला तो पूर्वीचा दगडफोड्या झाला!





4) मुले म्हणजे देवाची ठेव

एक होता राजा. तो रस्त्याने जात असता वाटेत जर लहान मुले भेटली तर त्यांना नमस्कार करी. राजा म्हाताऱ्या लोकांना नमस्कार करीत नसे. परंतु मुलांसमोर मात्र लवे. लोकांना याचे आश्चर्य वाटे. हळूहळू लोक राजाला वेड लागले असे म्हणू लागले.

गोष्ट प्रधानाच्या कानावर गेली. त्याच्या मनात आले की, राजाला आपण सारे सांगावे. एके दिवशी तो मुद्दाम उजाडताच राजाला भेटावयास गेला. राजाने विचारले, "आज इतक्या लवकर काय काम आहे?"
प्रधान म्हणाला, "महाराज मला तुम्हाला काही विचारावयाचे आहे."
राजा म्हणाला, "विचारा. संकोच करु नका."
प्रधान म्हणाला, "महाराज, तुम्ही वेडे झाले आहात असे सारे लोक म्हणतात."
राजा म्हणाला, "का बरे? मी कुणाच्या घरांना आगी लावित नाही. कोणाचे नुकसान करीत नाही. दुसरे देश लुटित नाही. प्रजेवर वाटेल तसे कर लादित नाही. मग मला वेडा का म्हणतात?"
प्रधान म्हणाला, "महाराज आपण दयाळू आहात, न्यायी आहात, सारे खरे. आपल्या कारकीर्दीत खेडोपाडी रस्ते झाले, विहिरी झाल्या, पाट झाले, उद्योगधंदे आहेत, सारे शिकलेले आहेत. न्याय आहे, नीती आहे. ते सारे खरे पण.."
राजा म्हणाला, "पण काय? कोणती माझी चूक झाली, कोणते अविचाराचे कृत्य झाले?"
प्रधान म्हणाला, "महाराज, तुम्ही रस्त्यातून जाताना शेंबड्या लहान पोरांना वाकून लवून नमस्कार करता. परंतु वृद्धांना कधी करीत नाही. नमस्कार करायचाच झाला तर म्हाताऱ्या मंडळीस करावा. लहान मुलांना का कोणी नमस्कार करतो?"
राजाने हसून विचारले, "म्हणून का मी वेडा?"
प्रधान म्हणाला, "लोक असे म्हणतात, राजा पोराबाळांना प्रणाम करतो. राजाला वेड लागले."
राजाने उत्तर दिले, "मी वेडा नाही. लोकांनाच कळत नाही. मी करतो ते बरोबर करतो."
प्रधानाने विचारले, "ते कसे काय?"
राजा म्हणाला, "जे लोक म्हातारे झाले, त्यांचा पराक्रम कळून चुकला. ते काय करणार, काय नाही, सारे जगाला कळले. त्यांची कर्तबगारी काय ती दिसून आली. परंतु लहान मुलांचे अद्याप सारे दिसावयाचे असते. लहान मुले पाहिली म्हणजे माझ्या मनात येते यांच्यातून उद्या कोण निर्माण होईल, कोणास ठाऊक? यांच्यातून मोठे कवी निघतात, चित्रकार निघतात, वीर निघतात, मुत्सद्दी निघतात, साधुसंत निघतात का मोठे शास्त्रज्ञ निघतात? काय सांगावे? सारे शक्य आहे. म्हणून मी मुलांना वंदन करतो. त्यांच्यातील अप्रकट शक्तीला नमस्कार करतो."
प्रधान म्हणाला, "महाराज आपले करणे बरोबर आहे. आम्हीच वेडे. आपण शहाणे आहात, दूरचे बघणारे आहात."
राजा म्हणाला, "म्हणून तर लहान मुलांची काळजी घेतली जावी म्हणून मी खटपट करतो. त्यांच्यासाठी फुलबागा आहेत, त्यांच्यासाठी क्रीडांगणे आहेत. त्यांच्यासाठी नाना वस्तूंची संग्रहालये आहेत. शाळांतून त्यांना गायीचे दूध मिळेल अशी व्यवस्था केली. मुलांमधील देव प्रकट होतो. मुलांची जीवने नीट फुलून त्याचा सुगंध पसरो. मुले म्हणजे देवाची ठेव. हिला जपले पाहिजे.
प्रधान म्हणाला, "खरे आहे महाराज. आता लोकांना मी समजावून सांगेन. इतके दिवस बालदिन पाळतात परंतु मुलांचे महत्त्व त्यांना कळले नाही. मलाही कळले नाही. आम्ही सारे वरवर पाहणारे लोक. बरे जातो."




5) खरा भक्त
का गावाबाहेर एक शंकराचे देऊळ होते. ते स्वयंभू स्थान होते. काळीभोर शंकराची पिंडी होती. त्या गावाच्या राजाची देवावर फार भक्ती. त्याने त्या देवाला सोन्याचा मुखवटा केला होता. शिवरात्रीच्या उत्सवात, श्रावण सोमवारी तो मुखवटा चढविण्यात येई. हजारो लोक पाहायला येत.


राजा रोज देवाच्या पूजेला जात असे. "पाहि मां पाहि मां" म्हणत असे. राजाकडची ती पूजा. तिचा थाट किती वर्णावा! किती सांगावा? सुंदर सुगंधी फुलांच्या माळा असत. बेलाच्या त्रिदळांच्या पाट्या भरलेल्या असत. चंदनाचा सुवास सुटलेला असे. उदबत्यांचा घमघमाट असे. ओवाळायला कापूर असे. बाहेर चौघडा वाजत असे. अशा थाटाने पूजा होई.

त्या देवळाजवळ एक संन्यासी राहायला आला. तो फार कोणाशी बोलत नसे. देवा शंकराला प्रदक्षिणा घालीत असे. आसन मांडून जप करीत बसे. तो झाडाचा पाला फक्त खाई. जवळ झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी पिई. असा त्याचा कार्यक्रम असे.

एकदा एक परगावचा मनुष्य त्या गावी आला. देवा शंकराच्या दर्शनास गेला. संन्यासी शांतपणे बसला होता.
"महाराज, आपणाला एक प्रश्न विचारु का?" त्या माणसाने विचारिले.
"विचारा." संन्यासी म्हणाला.
"तुम्ही येथे पुष्कळ दिवस आहात. देवाच्या पूजेला, देवाच्या दर्शनाला रोज किती तरी लोक येतात. त्यांच्यातील देवाचा खरा भक्त कोण?"
"खरे सांगू का?"
"खरे सांगा. दुसऱ्याच्या रागाची संन्याशाला काय पर्वा?"
"खरे आहे. ऐका तर. तेथे रोज दोन प्रहरी एक गुराखी येतो. तो, देवा शंकराचा खरा भक्त."
"हो."
"त्याला वेदमंत्र येत नसतील. जपजाप्य करीत नसेल तो. पूजा तरी कशाने करणार? कोठून आणील गंध? कोठून आणील नीरांजन? येथे राजा रोज पूजेसाठी येतो. कशी घवघवित दिसते ती पूजा. किती माळा, किती कापूर. त्या राजापेक्षाही का तो गुराखी मोठा भक्त?
"हो; पुन्हा पुन्हा काय सांगू?"
"महाराज, तुमच्या म्हणण्यावर विश्वास बसत नाही."
"उद्या प्रचीती दाखवितो. राजा पूजा करील त्यावेळेस व गुराखी दुपारी येईल त्या वेळेस तुम्हीही येथे असा."
"अवश्य येईन."

तो मनुष्य निघून गेला. संन्यासी आपल्या कर्मात रमला. दुसरा दिवस उजाडला. तो मनुष्य आधीच देवळात येऊन बसला. काही वेळाने राजा आला. चौघडा वाजू लागला. सनया आलापू लागल्या. महापूजा सुरु झाली. माळा चढविण्यात आल्या. कापूर पेटवून राजा ओवाळू लागला. इतक्यात काय झाले? ते देऊळ एकदम हलू लागले. भूकंप होणार असे वाटले. राजा घाबरला. दगड डोक्यावर पडतात की काय असे त्याला वाटले. त्याच्या हातातील ती हलकारती खाली पडली. कोठले ओवाळणे, कोठली पूजा. राजा धूम पळत सुटला. राजाच्या बरोबरचे सारे पळत सुटले. ती पूजा तशीच अर्धवट तेथे पडून राहिली.
दुपारची वेळ झाली. तो गुराखी आला. त्याच्या गाई रानात चरत होत्या. तो देवाच्या दर्शनाला आला. तो गाभाऱ्यात शिरला. पिंडीला त्याने कडकडून मिठी मारली. नंतर त्याने आपल्या भाकरीचा नैवेद्य देवासमोर ठेवला. क्षणभर त्याने डोळे मिटले. आणि तेथेच ती कांदाभाकर खाऊ लागला. आईच्या जवळ बसून जेवू लागला. देव म्हणजे सर्वांची आई ना?
इतक्यात ते देऊळ हलू लागले. दगड डोक्यावर पडणार असे वाटले. हातातील भाकरी हलू लागली. भूकंप होणार असे वाटले. परंतु त्या गुराख्याने काय केले? तो पळाला का? त्याने धूम ठोकली का? नाही. त्याने एकदम शंकराच्या पिंडीला मिठी मारली. "देवा, सांभाळ." असे तो म्हणाला.

देऊळ हलायचे थांबले. गुराख्याला आनंद झाला. त्याने भाकरी पोटभर खाल्ली. देवाला नमस्कार करुन पुन्हा रानात गेला. गाईसाठी बासरी वाजवू लागला.
प्रचीती ज्याला हवी होती तो मनुष्य तेथे होता.
"पटले की नाही?" संन्याशाने विचारले.
"राजा पळून का गेला? गुराखी तेथेच का राहिला?"
"अरे, राजा ज्या पिंडीची पूजा करीत होता, ती पिंडी त्याला खरोखर देवाची वाटत होती का? देऊळ हलू लागताच तो पळाला. देव जवळ असता तो पळाला का? संकटात देवाशिवाय कोण तारणार? परंतु ही पिंडी रक्षण करील असे त्याला वाटले नाही. त्याने स्वतःच्या पायांवर अधिक विश्वास ठेवला. ती पिंडी म्हणजे केवळ दगड. हीच त्याची शेवटी भावना झाली. परंतु तो गुराखी? देऊळ हलू लागताच पळाला नाही. त्याने पिंडीलाच मिठी मारली. संकटात लहान मूल आईला बिलगते. तो गुराखी देवाला बिलगला. त्याला ती पिंडी म्हणजे दगड वाटला नाही. त्याला तेथे खरोखर देव दिसत होता. ती पिंडी परमेश्वराची, देवा महादेवाची आहे, असे त्याला खरोखर वाटत होते. त्याचा खरा भाव होता, त्याची खरी भक्ती होती. त्याच्या पूजेत फुले नसतील, कापूर नसेल, चंदन नसेल. परंतु सर्व सुगंधांहून थोर असा खऱ्या भक्तीचा सुगंध त्याच्या पूजेत होता. आता पटले ना?" संन्याशाने शेवटी विचारले.
"होय महाराज." असे म्हणून विचार करीत तो मनुष्य निघून गेला.




6) सदिच्छेचे सामर्थ्य
एक होता राजा. तो फार दुष्ट होता. तो प्रजेला फार छळी. प्रजेला कोणतेही सुख नाही. डोक्यावर कर मात्र वाढत होते. प्रजा हवालदील झाली. 'असा कसा हा राजा, मरत का नाही एकदा,' असे ती म्हणे.

पुढे काय झाले. राजा आजारी पडला. त्याच्या सर्व शरीराला व्रण झाले. त्या व्रणातून पू येई, रक्त येई, माशा सभोवती भणभण करीत. गावोगावचे वैद्य आले. हकीम आले, नाना उपाय झाले. परंतु गुण पडेना, व्रण बरे होई ना. ती क्षते मोठी होऊ लागली. अपार वेदना होऊ लागल्या. राजाला वाटे मरण बरे.
गावाबाहेर एक नवीन साधू आला होता. लहानशी झोपडी बांधून तो राहिला होता. तो कोणाच्या आगीत नसे दुगीत नसे. रामनाम घेण्यात रंगलेला असे.
"राजा, गावाबाहेर एक साधू आला आहे. त्याच्याकडे जाऊन पाया पड. तो काही उपाय सांगेल." एक जुना वृद्ध मंत्री म्हणाला.
"न्या मला पालखीतून. पाहू या प्रयत्न करुन." राजा म्हणाला.
पालखीतून राजाला नेण्यात आले. साधू रामनामात रंगला होता.
"महाराज, राजा तुमच्याकडे आला आहे. पाहा त्याची स्थिती. किती दुर्दशा झाली आहे! तुम्ही सांगा काही उपाय. राजाला चैन पडत नाही. त्यामुळे राज्यकारभाराकडे लक्ष लागत नाही. तुम्ही दया करा." असे मंत्री हात जोडून म्हणाला.
पालखीवरील पडदा दूर करण्यात आला. राजा विव्हळत होता. माशा येऊन भणभण करु लागल्या. शिपाई त्यांना हाकलू लागले.
"फार होतो त्रास. महाराज, फार आहे दुःख. तुम्ही तरी आरोग्य द्या. माझ्यासाठी देवाला आळवा. देव तुमचे ऐकेल." राजा म्हणाला.
साधूने राजाची दशा पाहिली. तो तेथेच सचिंत उभा होता. "राजा, तुझ्यासाठी मी देवाची प्रार्थना करीन. परंतु तू सुद्धा मी सांगेन तसे केले पाहिजे. औषध घेतले पाहिजे. पथ्यपाणी सांभाळले पाहिजे." साधू म्हणाला.
"कोणते औषध घेऊ? जो उपाय सांगाल तो करीन. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी वागेन." राजाने सांगितले.
साधू म्हणाला, "राजा, तुझ्या सर्व अधिकाऱ्यांना प्रजेशी नीट वागण्याची आज्ञा दे. प्रजेवर किती तरी नवीन नवीन कर बसविण्यात आले आहेत, ते सारे कमी कर. शेतसारा फार वाढला आहे, तोही माफ कर. रस्ते नीट बांध. दवाखाने ठायी ठायी घाल. उद्योगधंद्याच्या शाळा काढ. त्याने बेकारी कमी होऊन लोक सुखी होतील. ठिकठिकाणी पाटबंधाऱ्यांची कामे सुरु कर. कालवे वाढव. तसेच लाचलुचपतीस आळा घाल. जंगलातील गवत, वाळलेले फाटे लोकांना मोफत नेऊ दे. अरे, प्रजा सारी दुःखी आहे. ती दुःखी असता तुला कोठून सुख! सारी प्रजा तुझ्या नावाने खडे फोडीत आहे. मी जेथे जातो तेथे हायहाय ऐकू येते. रोग वाढले, दारिद्र्य वाढले. मरणाचा सुकाळ झाला. 'असा कसा हा राजा, असा कसा हा राजा!' असे सारे बोलतात. म्हणून हो तुझ्या शरीराला ही व्याधी! तू नीट वाग, प्रजेला पोटच्या मुलाप्रमाणे पाळ म्हणजे बघ चमत्कार होईल. रोग पळून जाईल. तू बरा होशील."
मंत्री म्हणाले, "साधू महाराज, राजाच्या दुखण्याचा राज्यकारभाराशी काय संबंध? राज्यकारभार कसा चालवावा ते सांगायला आहेत मंत्री. तुम्ही एखादे औषध सांगा. झाडाचा पाला, एखादी मुळी, नाहीतर अंगारा असे काही द्या. राजाच्या दुखण्याची थट्टा नका करु."
साधू म्हणाला, "मला उपाय माहीत आहे तो सांगितला. दुसरे उपाय मला माहीत नाहीत. जडीबुटी मजजवळ नाही. राजाच्या दुखण्याची मी थट्टा नाही करीत. मी खरे ते सांगितले. दुसऱ्याच्या दुःखाची थट्टा करणारा साधू कसा असेल? मी तसा असेन तर माझी प्रार्थना तरी देव कसा ऐकेल?"
राजा म्हणाला, "प्रधानजी, साधू म्हणतो तसे करुन पाहू या. इतके बाह्य उपाय झाले. हकीम झाले, वैद्य झाले, मांत्रिक झाले, तांत्रिक झाले. आता साधू म्हणतो तसे वागू या. चला परत."
साधूला प्रणाम करुन ते सारे परत गेले. राजाने नवीन हुकूम दिले, अधिकारी नीट वागू लागले. डोईजड कर कमी झाले, शेतसार प्रमाणात झाला. रस्ते झाले, कालवे झाले. उद्योगधंद्याच्या शाळा झाल्या. लोकांना आज आजारीपणात औषधपाणी मिळू लागले. जसजसा राज्यकारभार सुधारु लागा तसतसा राजाचा रोग बरा होऊ लागला. प्रजा राजाला दुवा देऊ लागली.
"कसा उदार आहे राजा, किती प्रजेवर त्याचे प्रेम!" असे लोक म्हणू लागले. "राजा चिरायू होवो, सुखी होवो, उदंड आयुष्याचा होवो!" अस स्त्रीपुरुष, लहानथोर सारे म्हणू लागले.
हळूहळू राजा निरोगी झाला. शरीरावरचे व्रण गेले. शरीर तेजस्वी व सुंदर झाले. त्याचे मनही सुंदर झाले. त्याची बुद्धिही निर्मळ झाली. एके दिवशी राजा प्रधानाला म्हणाला, "त्या साधूने सांगितले तसे झाले. त्यांचे हे उपकार. त्यांना वाजतगाजत येथे आणू या. त्यांचा सत्कार करु या."
सारे शहर शृंगारले गेले. ठायी ठायी कमानी व तोरणे उभारण्यात आली. रस्त्यात चंदनाचा सडा घालण्यात आला. घोडेस्वार, हत्ती, वाजंत्री सारा थाट सजला. राजा साधूकडे गेला. त्याने आग्रह करुन साधूमहाराजांस पालखीत बसविले. स्वतः राजा पायी चालत निघाला. तो साधूवर चौऱ्या वारीत होता. मिरवणूक सुरु झाली. हजारो लोक जमले होते. साधूचा जयजयकार होत होता. लोक लाह्या, फुले यांची वृष्टी करीत होते. कोणी तर चांदीसोन्याची फुले उधळली. मिरवणूक संपली. महासनावर साधूमहाराज बसले. राजाने त्यांची पूजा केली. नंतर साष्टांग प्रणाम करुन राजा म्हणाला, "हजारो लोक जमले आहेत. दोन उपदेशाचे शब्द सांगा."
साधूमहाराज उभे राहिले. टाळ्यांचा कडकडाट झाला. नंतर सारे शांत झाले. साधू म्हणाला, "मी काय सांगू? मी एकच गोष्ट सांगतो. दुसऱ्याला कधी दुःख देऊ नका, दुसरा तुमचे भले चिंतील अशा रितीने वागत जा. सर्वांना तुम्ही हवेसे वाटाल असे वागा. मनुष्य जन्मतो तेव्हा स्वतः रडतो परंतु इतरांना आनंद होतो. आता असे मरा की, तुम्हाला मरताना आपण चांगले वागलो असे मनात येऊन आनंद वाटेल व असा चांगला मनुष्य मरणार असे मनात येऊन लोक रडतील. लोकांची सदिच्छा, लोकांचे आशीर्वाद हेच आपले सुख. राजा, तू नीट वागत नव्हतास. तुझा राज्यकारभार चांगला नव्हता. लोक म्हणत, "राजा म्हणजे पीडा. कधी सरेल ही पीडा." त्यामुळे तू व्याधीने पीडलास. परंतु तुझा कारभार कल्याणमय होऊ लागताच "किती चांगला राजा" असे लोक म्हणू लागले.
तुझा रोग हटला. प्रजेच्या आशीर्वादात राजाचे बळ, प्रजेच्या शापात राजाचे मरण, म्हणून सर्वांनाच सांगतो की, चांगल्या रीतीने वागा. एकमेकांचे शिव्याशाप न घेता एकमेकांचे आशीर्वाद घ्या. आणि हा संसार सुखाचा करा. पृथ्वीवर स्वर्ग आणा."




7) शब्दावरून पारख करावी

एक होता राजा. त्याचा स्वभाव जरा विचित्र होता. लोक त्याला कधी नावे ठेवीत, कधी त्याची स्तुती करीत. त्या राजाला एकदा एका साधुपुरुषाच्या दर्शनाची इच्छा झाली.
राजाने त्या साधूची कीर्ती ऐकली होती. परंतु त्या साधूचे दर्शन त्याला कधीच झाले नव्हते. "जो कोणी मला साधुपुरुषाचे दर्शन करवील, त्याला मी एक हजार सोन्याची नाणी देईन." अशी राजाने सर्वत्र दवंडी देवविली.
त्या साधूला कोणीच पाहिले नव्हते. साधू निरनिराळ्या वेशात वावरतो, निरनिराळी स्वरुपे धारण करतो, असे लोक म्हणत. साधूला ओळखायचे कसे?
एक गरीब मनुष्य होता. त्याला बायको होती. त्याला मुलेबाळे होती. परंतु घरात खायला नव्हते. आपली उपाशी मुलेबाळे पाहून त्याला वाईट वाटे.
तो राजाकडे गेला व म्हणाला, "राजा, मला आजच हजार सोन्याची नाणी दे. दोन महिन्याचे आत साधूचे दर्शन तुला घडवीन."
राजा म्हणाला, "दर्शन न घडविलेस तर?"
दरिद्री म्हणाला, "मरणाची शिक्षा मला दे."
राजा म्हणाला, "ठीक."
त्या दरिद्री माणसाला एक हजार सोन्याची नाणी देण्यात आली. तो घरी गेला. मुलांबाळांना आनंद झाला. बायको आनंदली. घरी आता कशाला वाण नव्हती. मुलाबाळांना चांगले कपडे करण्यात आले. त्यांच्या आंगावर दागदागिने घालण्यात आले. त्याची बायको सोन्याने पिवळी झाली.
पैठणीने सजली. नवीन घर बांधण्यात आले. शेतीवाडी खरेदी करण्यात आली. गाईगुरे विकत घेतली गेली. घोड्याची गाडी आली. अशी मौज झाली.
सर्वांना सुख झाले. परंतु तो दरिद्री मनुष्य दुःखी होता. त्याच्या डोळ्यांसमोर सारखे मरण होते, साधूपुरुष त्याला कोठे भेटणार, कोठे दिसणार? परंतु जरी मरणाच्या विचाराने त्याला दुःख होई, तरी त्यातल्या त्यात त्याला थोडे समाधान होते.
आपण जरी मेलो तरी मुलांबाळांना सुख होईल या विचारानेच त्याने राजाजवळ तसे वचन दिले होते. आपण मेलो तरी मुलांना ददात उरणार नाही, आणि आईही आहे त्यांची, काळजी घ्यायला; असे समाधान तो मानी. परंतु मरणाच्या कल्पनेचे दुःख काही कमी होत नसे.
त्याचे खाण्यापिण्याकडे लक्ष नसे. तो दुःखी, कष्टी, उदासी दिसे. तो अशक्त झाला. फिक्कट दिसू लागला. "तुम्हाला काय होते? नीट जेवत नाही; नीट बोलत नाही, का असे? घरात सारी सुखी आहेत, तुम्ही का दुःखी?" असे बायकोने विचारले.
"आपण सुखी झालो. परंतु कितीतरी गरीब माणसे जगात आहेत. त्यांना कोण देणार पोटभर खायला? त्यांच्या विचाराने मनाला वाईट वाटते." तो म्हणाला. "जगात दुःख पुष्कळ आहे. आपण काय करणार?" ती म्हणाली.
"थोडेपार दुःख दूर करता येईल तर बघावे." तो म्हणाला.
"मी अडल्यापडल्यास मदत करीन. भाकरीतुकडा कुणाला देत जाईन. मी उतणार नाही, मातणार नाही. गर्वाने दुसऱ्यास कधी हिडिसपिडीस करणार नाही." ती म्हणाली.
"देव तुझ्यावर दया करील." तो म्हणाला.
"परंतु तुम्ही हसा, खेळा, आनंदात रहा." ती म्हणाली. "देवाची कृपा होईल तर हसेन-खेळेन." तो म्हणाला.
तो गरीब मनुष्य दिवस मोजीत होता. एक महिना गेला. दुसरा सुरु झाला. त्याने साधूची सर्वत्र चौकशी केली, परंतु पत्ता लागेना. दुसरा महिनाही संपत आला. शेवटी तोही संपला.
राजाने त्या गरीब माणसाकडे शिपाई पाठविले. मोठा दरबार भरला. हजारो लोकही साधू येतो की काय, ते पाहण्यासाठी जमले होते. शिपायाबरोबर तो गरीब मनुष्य आला. त्याला तेथे उभे करण्यात आले.
"कोठे आहे साधुपुरुष!" राजाने विचारले.
"राजा, पुष्कळ हिंडलो फिरलो. परंतु साधूमहाराज दिसले नाहीत. त्यांना ओळखायचे तरी कसे? ते नाना रुपे धारण करितात. अमुकच ते असे कसे समजावे? माझ्यावर कृपा कर. माझी मुलेबाळे आहेत. मला मरणाची शिक्षा देऊ नकोस. मी पाया पडतो. निराधाराला आधार दे." तो गरीब मनुष्य म्हणाला.
राजा संतापला रागाने म्हणाला, "तू लफंग्या दिसतोस. तू फसवलेस. तुला का ही गोष्ट आधी माहीत नव्हती? ते साधूमहाराज नाना वेष धारण करतात, नाना रुपात वावरतात हे तुझ्या कानी नव्हते आले? आता क्षमा नाही. तुझी मरणाची शिक्षा टळत नाही. तुला हालहाल करुन मारले पाहिजे. साधे मरण नाही उपयोगी. राजाला फसविले आहेस." त्या राजाचे चार प्रधान होते. त्यांतील तिघांवर राजाची फार मर्जी होती. चौथ्यावर विशेषशी नव्हती. ते चारी प्रधान तेथे बसलेले होते.
राजाने पहिल्या प्रधानाला विचारले, "या लफंग्याला कसे मारावे?"
तो म्हणाला, "महाराज याला कुंभाराच्या आव्यात भाजून मारावे."
इतक्यात सभेतील एक मनुष्य उभा राहिला व म्हणाला, "राजा, शब्दावरुन माणसाची पारख करावी."
राजाने त्याच्याकडे पाहिले परंतु तो काही बोलला नाही.
नंतर त्याने दुसऱ्या प्रधानाला तोच प्रश्न केला. तो दुसरा प्रधान म्हणाला, "राजा, वस्तरा घ्यावा व त्याच्या शरीराचे राईराईएवढे तुकडे करावे."
सभेतील तो मनुष्य पुन्हा उभा राहिला व म्हणाला, "राजा, शब्दावरुन माणसाची पारख करावी."
राजाने रागाने त्याच्याकडे पाहिले. नंतर त्याने तिसऱ्या प्रधानाला विचारले. तो तिसरा प्रधान म्हणाला, "महाराज, याला भिंतीत चिणून मारावे."
पुन्हा तो सभेतील मनुष्य म्हणाला, "राजा, शब्दावरुन माणसाची पारख करावी."
त्या माणसाचे हे उद्धट वर्तन पाहून राजा संतापला. परंतु अद्याप चौथ्या प्रधानाला विचारायचे राहिले होते. शेवटी त्या चौथ्या प्रधानालाही विचारण्यात आले.
चौथा प्रधान म्हणाला, "महाराज, याला मारु नये. या गरिबाला सोडून द्यावे. पहा त्याची स्थिती. दोन महिन्यापूर्वी तो कसा होता व आज कसा आहे? तो केवळ अस्थिपंजर झाला आहे. रोज त्याच्या डोळ्यांसमोर मरण होते. आपण दोन महिन्यांनी मरणार असे सारखे त्याच्या मनात होते. तो क्षणाक्षणाला मरत होता. किती मानसिक वेदना त्याला झाल्या असतील? झाली एवढी शिक्षा त्याला पुरे. त्याला आणखी मारणे योग्य नव्हे. मेलेल्याला मारण्यात काय अर्थ?"
सभेतील तो पुरुष पुन्हा उभा राहिला व म्हणाला, "राजा, शब्दावरुन माणसाची पारख करावी."
राजा त्या माणसाकडे वळला व म्हणाला, "पुन्हा पुन्हा तू हे शब्द उच्चारीत होतास, त्याचा अर्थ काय? नीट काय ते सांग, नाहीतर तुलाही मरणाची शिक्षा देतो."
तो मनुष्य उभा राहून म्हणाला, "राजा, पहिल्या प्रधानाने मडकी भट्टीत भाजतात त्याप्रमाणे या माणसाला भाजून मारावे असे सांगितले. का बरे त्याने असे सांगितले? अरे, तो कुंभार आहे. परंतु तू त्याला प्रधान केलेस. त्याच्या डोळ्यांसमोर नेहमी मडकी असतात. आणि तो दुसरा प्रधान? तो आहे न्हावी. म्हणून त्याने वस्तऱ्याने तुकडे करावे असे सांगितले. त्याच्या डोळ्यांसमोर सदैव वस्तराच असायचा. आणि तो तिसरा प्रधान? तो आहे गवंडी. भिंती बांधणे हे त्याचे काम. म्हणून भिंतीत चिणून मारा असे त्याने सुचविले. कुंभार, न्हावी, गवंडी यांना तू प्रधान केलेस. त्यांचे धंदे वाईट नाहीत. त्या त्या धंद्याने ते समाजाचीच सेवा करतात. परंतु राज्यकारभार कसा त्यांना हाकता येईल? राज्यकारभार चालवायला मोठी दृष्टी हवी. जगाचा खूप अनुभव हवा. मनुष्य-स्वभावाचे ज्ञान हवे. खोल पाहता आले पाहिजे. नीट सल्ला देता आला पाहिजे. हा चौथा प्रधान भला दिसतो. किती सुंदर विचार त्याने सांगितले! कसा चांगला सल्ला त्याने दिला परंतु त्याच्यावर तुझा लोभ नाही. राजा, चांगले प्रधान नेम व त्यांच्या सल्ल्याने वाग."
त्या मनुष्याचे ते बोलणे ऐकून सर्वांनी माना डोलावल्या. परंतु ते तीन प्रधान खट्टू झाले. त्यांनी आपल्या माना खाली घातल्या. राजा म्हणाला, "त्या मनुष्याला इकडे आणा. या सिंहासनावर त्याला बसवू दे, त्याची पूजा करु दे."
परंतु कोठे आहे तो मनुष्य? कोठे गेला? कोठे बसला?
सारे इकडे तिकडे पाहू लागले. परंतु तो मनुष्य दिसेना. आता होता, क्षणात नाहीसा झाला. तो साधुपुरुषच तर नव्हता? होय. ज्याच्या दर्शनासाठी राजा अधिर झाला होता, तोच तो साधूमहाराज होता. परंतु आता काय?
तो चौथा प्रधान राजाला म्हणाला, "अनेक वेषात वावरणारे, नाना रुपात दिसणारे ते साधूमहाराज समोर होते. त्यांचे दर्शन तुम्हाला झाले. या गरीब माणसामुळेच शेवटी हे दर्शन झाले. दर्शनच नव्हे तर त्यांचे शब्दही तुम्हाला ऐकायला मिळाले. धन्य झालात तुम्ही, धन्य झालो आम्ही सारे."
राजा म्हणाला, "होय, ते साधूमहाराजच होते. या गरीब माणसाला सोडून द्या. शेवटी याच्यामुळे दर्शन झाले. याला आणखी एक हजार नाणी द्या. जा. गरीब माणसा, जा. सुखी रहा."
त्या तीन प्रधानांकडे वळून राजा म्हणाला, "तुम्ही आपापले धंदे करायला जा. ते धंदे नीट करा म्हणजे झाले. ज्यांच्यावर माझी मर्जी नव्हती, त्यांना आता मी मुख्य प्रधान नेमतो. राज्यकारभार कसा हाकावा हे तेच चांगले सांगतील."
ते तीन प्रधान निघून गेले. चौथा प्रधान मुख्य प्रधान झाला. राज्याचा कारभार चांगला चालू झाला. आणि तो गरीब मनुष्य? त्याच्या घरात आनंदीआनंद झाला. बाबा परत आले म्हणून मुले उड्या मारु लागली. पत्नीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. "तुम्ही आमच्या सुखासाठी मरण पत्करले होते. आमची दैना तुम्हाला पाहवेना? होय ना? किती तुमचे आमच्यावर प्रेम!" ती स्फुंदत म्हणाली.
"त्या प्रेमानेच वाचलो. त्या त्यागानेच देव प्रसन्न झाला. त्याने दया केली. आता मी हसेन-खेळेन. आनंदात राहीन. सारीच आनंदात राहू." तो म्हणाला.
"हो. सारी आनंदाने राहू, गंमत करु." मुले नाचत म्हणाली.