या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

२)काचकथा

एका शहरात एक प्रवचनकार होते. त्यांच्याकडे त्यांचा मित्र एकदा भेटायला आला. तसा तो नेहमीच येत असे. तो मित्र खूप श्रीमंत होता. पण तो कंजूष होता. तो नेहमी आपल्या श्रीमंतीबद्दल बढाया मारत असे. प्रवचनकार त्याला थोपवत. विषय बदलवत. तरीही तो पुन्हा फिरून त्याच्या श्रीमंतीवर यायचा. स्वत:च्या सुखाबद्दल व ऐश्‍वर्याबद्दल बोलायचा. त्या दिवशी प्रवचनकारांनी त्याला आपल्या खोलीच्या खिडकीजवळ नेले. खिडकीच्या दरवाजांना काच लावलेली होती. काच स्वच्छ होती. आरपार दिसत होते. बाहेरचे रस्त्यावरील दृश्य बोटाने दर्शवत प्रवचनकारांनी त्याला विचारले, 'मित्रा, बघ बरं तेथे काय आहे?'थोडावेळ बाहेर लक्षपूर्वक बघितल्यावर तो श्रीमंत मित्र कंटाळून म्हणाला, 'काहीच नाही. बाहेर पदपथावर असलेल्या लोकांबद्दल तर तुम्हाला म्हणावयाचे नाही ना?' प्रवचनकार काहीही बोलले नाही. ते तेथून आतल्या खोलीत आले. त्यांच्यासोबत तो श्रीमंत मित्र होताच. तेथे सहा फूट उंचीचा एक सुंदर आरसा भिंतीला लावलेला होता. प्रवचनकार मित्राला म्हणाले, 'आता यात बघ बरं.. तुला काय दिसतंय ते?' मित्राने आरशात बघितले. तो म्हणाला, 'मी मला स्वत:लाच बघत आहे. दुसरं काय दिसणार आरशात?' प्रवचनकार म्हणाले, 'ठीक आहे. खिडकीलाही काचच आहेत आणि इथेही काचच आहे. पण इथल्या काचेला मागून पार्‍याचा लेप आहे. त्यामुळे दुसरे काहीच दिसत नाही. फक्त आपणच दिसतो. खिडकीच्या काचेतून तुला माणसाचे दारिद्रय़ दिसले नाही.'गोष्ट खरी का खोटी हे मलाही ठाऊक नाही. पण त्यात सत्य सामावलेले आहे. भौतिक सुखसंपत्तीलाच सर्वस्व मानणं आणि नेहमी त्याचाच विचार करण्यामुळे आपल्या मनात इतरांचा विचारच डोकावत नाही. त्यामुळे मानवप्रेमाचा रस्ता बंद होतो. आरशाप्रमाणे माणसाला फक्त आपलंच रूप दिसतं. त्याचं जीवन एकांगी बनतं. संपत्ती हे सुखाचं सुंदर साधन आहे. पण संपत्ती अनेक सुखांना बाधक ठरते. 
तात्पर्य : किसी के काम न आये तो आदमी क्या है! जो अपनी फिक्र में गुजरे वो जिंदगी क्या है?