या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

धाव शिक्षका धाव

धाव शिक्षका धाव रे
शाळा सोडून सारा गाव रे

वर्गात शिकवायचे बंद कर
गल्ली बोळ फिरायचा छंद कर
खडू डस्टर हाती धरू नको
सरकारी योजना राबवीण्यास मागे सरू नको
नाहीतर गुन्हेगार म्हणून
होईल तुझे नाव रे
          धाव शिक्षका धाव रे

जनगणनेची डोकी मोज
दारोदारी भेटी रोज
आधार , वोटिंग कार्ड जोडून दे
शेत जमीन खाते फोडून दे
गावकऱ्यांची सगळी कुंडली
तुलाच फक्त ठाव रे
 .        धाव शिक्षका धाव रे

मतदारांची नोंदणी कर
डबल झालेली छाननी कर
शाळाबाह्य मुलांचा पुरावा आण
तोपर्यंत शाळेशी दुरावा मान
पाय पड , हात जोड
येथे सारे बाजीराव रे
 .        धाव शिक्षका धाव रे

खुन दरोडा सारे पंचनामे
आता तुझ्या साक्षीने होणार आहेत
शाळे ऐवजी तुझी हजेरी
कोर्टात पोलीस घेणार आहेत
शिक्षण क्षेत्राबाहे सगळीकडे
वाढला तुझा भाव रे
          धाव शिक्षका धाव रे

बी एड, डी एड आता आठवू नको
तसं शिकवायचं डोक्यात साठवू नको
खिचडी कामांची करीत रहा
त्यांचे मस्टर नीटनेटके भरीत रहा
इतक्या आघड्यवर लढूनही शेवटी
तुझ्याच नावाने काव काव रे
 . . . . .  धाव शिक्षका धाव रे
 . . . . .  शाळा सोडून सारा गाव रे