या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

बोधकथा एकत्वसंस्कार कथा

एका मोठय़ा शहरातील प्रसिद्ध विद्यालय होते. शहरात विविध जाती-धर्माचे लोक राहत. कास्मोपॉलिटन शहर होते. त्याचंच प्रतिबिंब विद्यालयात पडत असे. विद्यालयाचे चालक प्रगत व सुधारणावादी होते. त्यांनी अनेक प्रकारची बक्षिसे मुला-मुलींसाठी ठेवलेली होती. ही बक्षिसे केवळ परीक्षांतील गुणांवरच निर्धारित होती असे नव्हे. जीवनमूल्ये, सदाचार, एकता, मानवता अशा दृष्टीनेही बक्षिसे दिली जात. काही बक्षिसे वैयक्तिक तर काही सामूहिकपणे तीन, चार वा पाच विद्यार्थ्यांच्या गटांना दिली जात. सर्वांनी सहजतेने, परस्परात मिसळून व प्रेमाने वागावे म्हणून गटाला बक्षिसे दिली जात. तीन विद्यार्थ्यांच्या एका गटाला सदाचार व उत्कृष्ट चरित्राचे एक बक्षीस जारी झाले. समितीने प्रथम या निकषासाठी वैयक्तिक निवड केली. नंतर त्या तिघांचा गट बनवून ते बक्षीस त्या गटाला दिले. तिघांना मिळून एकच नाणे होते. त्या तिघांनी संगनमताने ते वाटून घ्यायचे होते. विद्यार्थ्यांमध्ये एक हिंदी भाषक होता. दुसरा पारशी बोलणारा होता, तर तिसरा इंग्लिश बोलणारा होता. परस्परांची भाषा ते समजत नव्हते. इंग्लिश सर्व जाणत, पण इंग्रज मुलाने जो शब्द सांगितला होता, तो नेमका बाकी दोघांना ठाऊक नव्हता. एका नाण्याची तिघात वाटप कशी करायची ही एक समस्या बनली. इंग्लिश मुलगा म्हणाला, मला माझ्या हिश्श्याचे 'वॉटर मेलन' हवे. पारशी म्हणाला, 'मला 'हंदुवाना' हवा. हिंदी मुलाने 'टरबूज' मागितले. गोष्ट वाढली. पण समेट काही झाला नाही. शेवटी तिघे एका व्यक्तीकडे गेले. त्याला तिन्ही भाषा अवगत होत्या. तिघांनी आपापले म्हणणे सांगितले. त्या व्यक्तीने ते नाणे घेतले. बाजारात गेला. तेथून एक मोठेसे 'टरबूज' घेऊन आला. तिघांचे चेहरे खुलले. त्याचे त्या व्यक्तीने तीन समान तुकडे केले. इंग्लिश भाषकास 'वॉटर मेलन' दिले. पारशी मुलाला 'हदुवाना' दिले. हिंदी भाषकाला 'टरबूज' दिले. तिघे आनंदित झाले. तिघांची इच्छा एकच होती. भाषा न समजल्यामुळे गोंधळ उडाला होता. एकाच वस्तूसाठी अज्ञानामुळे भांडत होते. जगात अशीच स्थिती सर्वत्र आहे. ध्येय सगळ्य़ांचे एकच आहे. उत्तम जगण्याचे. पण भाषा, जात, धर्म, वंश, वर्ण यामुळे भेदभाव निर्माण होतात. विविधतेत मात्र एकत्व शोधता यायला हवे.

तात्पर्य : मातृभाषेशिवाय प्रत्येकाने दुसरी एक भाषा उत्तम अवगत करावी.

No comments:

Post a Comment