या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

४) पश्‍चात्तापदग्ध कथा

क होता राजा. त्याने आपले राज्य सुरक्षित राखले होते. त्याचे सैन्य नेहमी दक्ष व सज्ज असे. शेजारी राजे त्याच्यावर आक्रमण करण्यास धजावत नसत. परंतु सलग तीन वर्षे दुष्काळ पडला. लोकांना कामं नव्हती. शेतकरी हवालदिल झाले होते. बेरोजगारी वाढत होती. त्यामुळे अंतर्गत सुरक्षा व शांतता धोक्यात आली होती. गुन्हे वाढत होते. तुरुंगातील कैद्यांची संख्या वाढली होती. यामुळे राजा विचारप्रवण झाला होता. त्याने मंत्र्यांशी सल्लामसलत केली. निर्दोष व्यक्ती तुरुंगात खितपत पडता कामा नये. म्हणून राजाने एकदा मंत्र्यासह तुरुंगाला भेट द्यायचे ठरविले. कैद्यांचे गुन्हे समजून घ्यावेत. तसेच जुजबी गुन्हेगारांना सुधारण्याची संधी द्यावी. चुकीने शिक्षा झालेले कोणी असतील तर त्यांना मुक्त करावे, असा त्याचा उद्देश होता.

राजा तुरुंगात आला. कैद्यांना अगोदरच सूचना दिली गेली होती. राजा येताच कैदी धावतपळतच राजाजवळ आले. त्यांनी मंत्र्याला व राजाला गराडाच घातला. त्यांनी लवून लवून नमस्कार करायला प्रारंभ केला. राजाने तुरुंग अधिकार्‍याकडून एकेकाची चौकशी केली. सगळ्यांचे गुन्हे, शिक्षा तसेच तुरुंगातील व्यवस्थेबद्दल माहिती घेतली. आता आपली सुटका होणार असे कैदी समजत होते. पण ते बहुतेक अट्टल गुन्हेगारच होते. चतूर होते. एकापेक्षा एक धूर्त होते. सगळेच राजासमोर दीन बनले. गरीब बनले. केविलवाणे होऊन विनंती करू लागले. गयावया करू लागले. पाया पडू लागले. खोटे नक्राश्रू ढाळू लागले. आम्ही सर्व निर्दोष असून आम्हाला फसवले गेल्याचे ते सांगत होते. खोटे आरोप लादून तुरुंगात डांबले असल्याचे सांगत होते.

आम्हाला बळजबरीने घरातून ओढून पोलिसांनी इथे आणले असल्याचे काही म्हणाले. आमचे कोणीही ऐकणारा नाही. म्हणून आमची शिक्षा माफ करून आम्हाला मुक्त करावे. सर्वांचे म्हणणे राजाने शांतपणे ऐकत ते परत फिरू लागले. तेव्हा कोठडीत एका कोपर्‍यात न भेटलेला कैदी राजाला दिसला. राजा त्याच्याजवळ गेला. 'तुला काही सांगायचंय काय?' असे विचारले. तो पश्‍चात्तापदग्ध माणूस म्हणाला, 'मी अत्यंत घोर गुन्हा केलेला आहे. त्यामानाने मला शिक्षा कमीच झाली आहे. माझ्या डोक्यावर तर पापाचे गाठोडे आहे. या शिक्षेने माझ्या पापाची काही भरपाई होणार नाही. पापाचे गाठोडे वाहतच मी मरेन.'

सम्राट व अधिकारी तुरुंगाच्या बाहेर आले. सम्राट तुरुंग अधिकार्‍याला म्हणाले, 'त्या शेवटच्या कैद्याला मुक्त करा. बाकीचे कैदी धूर्त असून ते तर सुधारणार नाहीतच, शिवाय इतरांनाही सुधारू देणार नाही. त्यांना आपल्या करणीचा पश्‍चात्ताप नाही.'

तात्पर्य : खोटे नाटे बोलून उपलब्ध झालेल्या संधीचा गैरफायदा घेऊ नये.