या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

बोधकथा दि. 06/10/2015

संदेश
एका विदेशी भाषेतील गोष्ट आहे. एक माणूस होता. त्याला एकुलती एक कन्या होती. तिची आईसुद्धा स्वर्गवासी झाली होती. ती एकुलती एक कन्या हाच त्या माणसाचा आधार होता. कन्या त्याची खूप लाडकी होती. तो तिच्याचसाठी जगत होता. तीच त्याचे जीवन होती. ती आठ-नऊ वर्षांची असताना आजारी झाली. चांगल्यात चांगल्या डॉक्टरांकडे त्याने कन्येला नेले. औषधोपचार केलेत. पण ते उत्तम डॉक्टरसुद्धा तिला बरे करू शकले नाहीत. तो पिता बावरला. तिला रोगमुक्त करण्यासाठी त्याने आकाशपाताळ एक केले. पण सारे प्रयत्न निर्थक ठरलेत. कन्या मरण पावली.

त्या पित्याचे मानसिकस्वास्थ्य हरवले. तो निराश झाला. तो एकटा एकटा राहू लागला. तो एकांतात खूप कासावीस व्हायचा. रडायचा. ओक्साबोक्सी रडायचा. नातेवाईक, मित्र या सर्वांना तो टाळू लागला. सर्वांशी त्याने अलिप्तता ठेवली. ज्या ज्या गोष्टींनी जीवनक्रम पुन्हा सुरू करता येईल आणि स्वस्थ जीवन जगता येईल त्या त्या सार्‍या बाबी त्याने नाकारल्या.

एका रात्री त्याला स्वप्न डले. तो स्वर्गात गेला. तेथे त्याला छोट्या छोट्या बाल देवदूतांचा उत्सव दिसला. एका पांढर्‍या शुभ्र सिंहासनाजवळून गोंडस व सुंदर बालकांची न संपणारी रांग चालली होती. पांढराशुभ्र छान वेष परिधान केलेल्या बाल देवदूतांजवळ जळत असलेल्या मेणबत्त्या होत्या. पण एका बालिकेच्या हातातील मेणबत्ती विझलेली होती.

ती बालिका त्याचीच कन्या होती. तो तिच्याकडे झेपावला. उत्सव एकदम थांबला. आपल्या मुलीला मांडीवर घेऊन कुरवाळत तो म्हणाला, 'बाळ, फक्त तुझीच मेणबत्ती का विझली आहे?' ती कन्या म्हणाली, 'बाबा, येथील लोक नेहमीच पुन्हा पुन्हा ही मेणबत्ती पेटवितात, पण तुमच्या आसवांनी ती पुन्हा पुन्हा विझते.'

तेव्हा त्या माणसाला झोपेतून एकदम जाग आली. संदेश स्पष्ट होता. त्याचा प्रभाव त्याच्यावर खूप खोलवर पडला. त्याने स्वत:ला एकांताच्या कैदेतून मुक्त केले. आनंदपूर्वक जीवन जगू लागला. त्याने रडणे सोडले.

तात्पर्य : मरण अटळ असते. जीवनात शोकालाही र्मयादा असाव्यात.

No comments:

Post a Comment